FLAG & PENNANT CHART PATTERNS IN MARATHI | फ्लॅग आणि पेनंट चार्ट पॅटर्न मराठी मधे

 

चार्ट पॅटर्न भाग -१ । CHART PATTERN -1

Table of Contents

                   शेअर बाजार मध्ये काम करायचे असेल तर फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस या दोन महत्त्वाच्या बाबी समजणे खूप गरजेचे आहे. याविषयी आपण अगोदरच्या लेखांमध्ये चर्चा केलेली आहे. टेक्निकल अनालिसिस ट्रेडर्स साठी जास्त महत्त्वाचा भाग आहे. टेक्निकल अनालिसिस मध्ये कॅन्डल स्टिक पॅटर्न  , टेक्निकल इंडिकेटर, चार्ट पॅटर्न इत्यादी घटक येतात. या विषयी माहिती असणे एका ट्रेडर्स साठी जरुरीचे असते टेक्निकल अनालिसिस या विषयातील कॅन्डल स्टिक पॅटर्न आणि काही टेक्निकल इंडिकेटर्स याविषयी आपण या अगोदर माहिती घेतलेली आहे. आता इथून पुढे आपण काही चार्ट पॅटर्न विषयी माहिती करून घेऊ या. चार्ट पॅटर्न हा मोठा विभाग असल्यामुळे आपण प्रत्येक लेखामध्ये एक किंवा दोन चार्ट पॅटर्न विषयी माहिती घेऊ. या सीरिजमध्ये कमीत कमी दहा चार्ट पॅटर्न विषयी माहिती देण्याचा प्रयत्न याठिकाणी करण्यात येणार आहे. चार्ट पॅटर्न समजण्यासाठी ची सर्वात बेसिक गोष्ट म्हणजे कॅन्डल स्टिक म्हणजे काय ? आणि ते कशा प्रकारे काम करतात याची माहिती असावी त्याविषयी जर तुम्ही माहिती घेतली नसेल तर हा लेख वाचायला सुरूवा करण्याअगोदर त्याची माहिती घेऊन या. कॅन्डल स्टिक पॅटर्न भाग १ आणि कॅन्डल स्टिक पॅटर्न भाग २

चार्ट पॅटर्न  । CHART PATTERN 

          चार्ट पॅटर्न हा कॅन्डल स्टिक पॅटर्न आणि अन्य कॅण्डल च्या समूहाने बनतो. वरती जाणारा कॅण्डल चा समूह हा UPTREND तर खाली जाणारा समूह हा DOWNTREND दर्शवितो. चार्ट पॅटर्न साठी वेळेची मर्यादा नसते तो एक दिवस , एक महिना किंवा एक वर्षातही बनू शकतो. यानुसार गुंतवणूकदाराला शेअर चा भाव कोणत्या दिशेने जाणार आहे याचे संकेत मिळतात आणि त्यानुसार शेअर खरेदी करायचा की विक्री करायचा याचा निर्णय घेता येणं सोप्प होते. पॅटर्न पूर्ण झाल्यावर भाव वाढतो किंवा कमी होतो. 

 चार्ट पॅटर्न चे २ प्रकार आहेत 

 1. रिव्हर्सल चार्ट पॅटर्न । REVERSAL CHART PATTERN 

                                             या प्रकारच्या चार्ट पॅटर्न मध्ये तेजी किंवा मंदी मधे आता ती चाल आपली दिशा बदलून विरुद्ध दिशेने वाटचाल सुरु होणार असल्याचे संकेत मिळतात. जसे की तेजी मध्ये जर BEARISH रिव्हर्सल पॅटर्न बनला तर आता तेजी संपून मंदी सुरु होणार असा संकेत मिळतो अश्याच प्रकारे मंदीत ही बुलिश रिव्हर्सल बनू शकतो. यामध्ये एक गोष्ट आहे लक्षात घेतली पाहिजे कि असे रिव्हर्सल पॅटर्न मिळाले की  लगेच त्यामध्ये उडी ना घेता बाकीचे टेकनिकल इंडिकेटर्स पण त्याबरोबर मेळ घालून पाहावा उदा RSI, VOLLUME , MACD . यामध्ये शक्यतो भूतकाळातील पॅटर्न पुन्हा पाहायला मिळतो. 

काही रिव्हर्सल पॅटर्नची नावे 

  • HEAD & SHOULDER 
  • DOUBLE TOP / BOTTOM 
  • ROUNDING BOTTOM 

 २. कंटिन्यूएशन चार्ट पॅटर्न | CONTINUATION CHART PATTERN

                               यामध्ये शेअर किंवा मार्केट ची वाटचाल ज्या दिशेने चालू आहे त्याच दिशेने ती चालू राहण्याचे संकेत मिळतात म्हणजे जर एखादा शेअर तेजी मधे असेल तर तो अजूनही वरचे स्तर  गाठू शकतो . आणि जर तो मंदीत असेल तर तो अजूनही गडगडण्याची शक्यता आहे. 

काही कॉन्टीनुएशन पॅटर्नची नावे 

                या भागामध्ये आपण फ्लॅग चार्ट पॅटर्न आणि पेनंट चार्ट पॅटर्न या दोन पॅटर्न विषयी माहिती घेणार आहोत हे दोन्ही चार्ट पॅटर्न जवळ जवळ एकमेकां सारखेच आहेत त्यामधील स्टॉप लॉस आणि टारगेट ठरवण्याची पद्धतही समानच आहे म्हणून हे दोन्ही एकत्र देण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे ते समजायला सोपे जातील. 

FLAG CHART PATTERN | फ्लॅग चार्ट पॅटर्न

 फ्लॅग पॅटर्न म्हणजे काय ? | WHAT IS FLAG CHART PATTERN?

                      चार्ट मध्ये काही कॅन्डल स्टिक अशा पद्धतीने बनतात की ज्याचा आकार एखाद्या झेंड्या/ ध्वजा  सारखा दिसतो. ज्यामध्ये एका ट्रेंड ची दिशा दर्शविणारा दांडा ( फ्लॅग पोल ) असतो, तर एका एका रेंज मध्ये चढ-उतार दर्शविणाऱ्या कॅण्डल स्टिक या फडकणारा झेंडा/ ध्वज दर्शवितात. चार्ट मध्ये हा पॅटर्न शेअर किंवा निर्देशांकाची चालू असणारी दिशा तेजी किंवा मंदी पुढे तसेच चालू राहणार असल्याचे संकेत देतो तेजी किंवा मंदी या आधारे फ्लॅग पॅटर्नचे दोन प्रकार पडतात.

  1. बुलिश  कंटिन्यूएशन फ्लॅग पॅटर्न
  2. बेरिश कंटिन्यूएशन फ्लॅग पॅटर्न  

बुलिश  कंटिन्यूएशन फ्लॅग पॅटर्न | BULLISH CONTINUATION FLAG PATTERN 

            नावाप्रमाणेच चार्ट मध्ये हा पॅटर्न बनल्यानंतर शेअर किंवा निर्देशांकामध्ये चालू असलेली तेजी अजून काही काळासाठी चालू राहणार असल्याचे संकेत मिळतात.

 बुलिश  कंटिन्यूएशन फ्लॅग पॅटर्न कसा बनतो ?

                                      बाजारामध्ये मोठी हालचाल ( शार्प मुव्हमेंट) चालू असेल तेव्हा हा पॅटर्न बनतो. फ्लॅग पॅटर्न बनण्यासाठी शार्प मुव्हमेंट खूप महत्त्वाची असते. शेअर किंवा निर्देशांकामध्ये जर कॅन्डलेस्टीक वरच्या दिशेने चालले असेल तर तो  पॅटर्न बनण्यासाठी च्या दांड्याचे ( फ्लॅग पोल ) काम करतो ही शार्प मुव्हमेंट होत असताना, त्या शेअर / निर्देशांकामध्ये व्हॉल्युम मध्ये वाढ दिसून येते. या पॅटर्न साठी व्हॉल्युम मधील वाढ खूप महत्त्वाची असते. या एकदम वरच्या चालीनंतर  किंमत काही काळासाठी कन्सोलिडेशन मधे जावुन एका रेंज मध्ये काम करतात. ही कामकाजाची रेंज थोडी खालच्या बाजूला झुकलेली असते आणि याच रेंजमध्ये छोटे – छोटे सपोर्ट आणि रेजिस्टन्स बनतात. आणि वोल्युमही काही प्रमाणात कमी झालेला असतो. जेव्हा दोन सपोर्ट आणि रेजिस्टन्स बनतील तेव्हा दोन्ही रेजिस्टन्स ना जोडणारी एक ट्रेंड लाईन टाकली जाते, त्याच बरोबर दोन्ही सपोर्टला जोडणारी एक  ट्रेंड लाईन टाकली जाते. यामध्ये लक्ष देण्यासारखे बाब म्हणजे या दोन्ही ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स ट्रेंड लाईन या एकमेकांना समांतर असतात हे एका चायनल प्रमाणे दिसतो. जेव्हा शेअरची किंमत रेजिस्टन्स ट्रेंड लाईनला ब्रेक करून वरती जाऊन बंद होते, तेव्हा पुन्हा तेजीची सुरुवात झाली आहे असे संकेत मिळतात ही ट्रेंड लाईन ब्रेक करताना पुन्हा एकदा व्हॉल्युम वाढलेला असतो.

खरेदी कशी करावी ?

               जेव्हा शेअर किंवा निर्देशांकाची किंमत मध्ये रेजिस्टन्स लाईन ब्रेक होऊन कॅन्डल स्टिक त्यावरती बंद होते. त्यानंतरच्या कॅण्डल मध्ये खरेदी करावी आणि ज्या कॅन्डल् स्टिक ने रेजिस्टन्स लाईन ब्रेक केली आहे त्या कॅण्डल स्टिक च्या निम्नस्तर ( LOW) च्या खाली स्टॉपलॉस लावा. स्टॉपलॉस आणि खरेदी किंमत हा जर रिस्क रिवॉर्ड रेशो नुसार योग्य असेल तरच खरेदी करावी .आता फ्लॅग पॅटर्नचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे खरेदीनंतर टारगेट किती असावे?

 फ्लॅग पॅटर्न नुसार टारगेट कसे ठरवावे ?

                ज्या कॅन्डल स्टिक पासून सुरुवातीची तेजी सुरू झालेली आहे म्हणजेच ज्या ठिकाणावरून झेंड्याचा दांडा ( फ्लॅग पोल ) सुरू झालेला आहे तिथपासून तर ज्या ठिकाणी पोल संपून शेअरच्या किमतीने एका रेंज मध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे, त्या कॅन्डल स्टिक च्या सर्वोच्च स्तरापर्यंत जितकी मुव्हमेंट झालेली आहे. तेवढेच पॉईंट तुम्हाला ब्रेक आउट नंतरच्या टारगेट साठी पकडायचे आहेत. उदाहरणार्थ जर पोल ची सुरवात 50 या किमती पासून सुरू झालेली असेल आणि 60 या किमतीवर रेजिस्टन्स लागुन कन्सोलिडेशन सुरू झाले असेल, तर ब्रेक आउट नंतर वरती 10 पॉईंट चे टारगेट असेल. ( वरती दिलेल्या इमेज मधील A आणि B बिंदू पहा टार्गेट कसे काढायचे समजून येईल. )

बेरीश कंटिन्यूएशन फ्लॅग पॅटर्न | BEARISH CONTINUATION FLAG PATTERN

                चार्ट मध्ये या प्रकारचा चार्ट पॅटर्न बनला तर शेअर मध्ये किंवा निर्देशांकामध्ये चालू असलेली मंदी अजून काही काळासाठी चालू राहणार असल्याचे संकेत मिळतात. हा पॅटर्न मंदीमध्ये बनतो.

बेरीश कंटिन्यूएशन फ्लॅग पॅटर्न कसा बनतो ?

           बाजारामध्ये जोरदार मंदी चालू असेल तेव्हा या प्रकारचा पॅटर्न बनतो. यामध्ये मंदी बरोबरच व्हॉल्युम ही वाढलेला असतो ज्या कॅन्डल स्टिक पासून जोरदार मंदीला सुरुवात झाली तिथपासून झेंड्याचा दांडा ( फ्लॅग पोल ) बनायला सुरुवात होते. आणि एका ठिकाणी जाऊन कॅन्डल स्टिक सपोर्ट घेते. त्या ठिकाणी शेअर्स किंवा निर्देशांकाची किंमत एका रेंज मध्ये काम करायला सुरुवात करते याबरोबरच व्हॉल्युम मध्ये काहीशी घट दिसून येते. ही रेंज काहीशी वरच्या बाजूला झुकलेली असते याच रेंजमध्ये छोटे छोटे सपोर्ट आणि रेजिस्टन्स बनायला लागतात. जेव्हा दोन दोन सपोर्ट आणि रेजिस्टन्स बनतील तेव्हा दोन रेजिस्टन्सना जोडणारी एक ट्रेंड लाईन काढली जाते तसेच सपोर्ट ला जोडणारी ही ट्रेंड लाईन काढली जाते. या ठिकाणीही या दोन्ही ट्रेंड लाईन एकमेकांना समांतर असतात. जेव्हा शेअर किंवा निर्देशांकाची किंमत सपोर्ट लाईनला तोडून खाली बंद होते, तेव्हा मंदी पुन्हा सुरू झाल्याचे संकेत मिळतात. आणि व्हॉल्युम मध्येही पुन्हा वाढ झालेली दिसून येते.

विक्री कशी करावी ?

          जेव्हा शेअरची किंवा निर्देशांकाची कॅन्डल स्टिक सपोर्ट ट्रेंड लाईनला तोडून खाली बंद होते. त्यानंतरच्या कॅण्डल स्टिक मध्ये विक्री करावी आणि ज्या कॅन्डल स्टिक ने सपोर्ट लाईन तोडली आहे, त्याच्या सर्वोच्च भावाच्या ( HIGH) वरती स्टॉपलॉस लावा. विक्री करताना रिस्क रिवॉर्ड रेशो नक्की तपासून पहावा. रिस्क रिवॉर्ड रेशो नुसार जर विक्री योग्य ठिकाणी होत नसेल तर विक्री करू नये.

बेरीश कंटिन्यूएशन फ्लॅग पॅटर्ननुसार टारगेट कसे ठरवावे ?

                ज्या कॅन्डल स्टिक पासून मंदीची सुरूवात  झालेली आहे तीथपासून तर ज्या कॅन्डल स्टिक पासून शेअरच्या किंमती ने सपोर्ट घेऊन एका रेंज मध्ये काम करायला सुरुवात केली आहे. तिथ पर्यंतचे जेवढे अंतर आहे तेवढेच अंतर ( पॉईंट ) तुम्हाला सपोर्ट लाईन तोडल्यानंतर टारगेट साठी ठेवायचे आहेत.  समजा मंदीला सुरुवात 100 या किमती पासून झालेली असून 90 या किमतीवर शेअर एका रेंज मध्ये गेलेला आहे. म्हणजेच सपोर्ट लाईन तोडल्यानंतर तुमचे टार्गेट हे तिथून  खाली 10 पॉईंट चे असेल.

             फ्लॅग पॅटर्न बनण्यासाठी कोणत्याही टाईम फ्रेमची सक्ती नाही. तो कोणत्याही टाईम फ्रेम मध्ये बनू शकतो आणि चांगले काम करू शकतो. फक्त पॅटर्नप्रमाणेच तुम्हाला व्हॉल्युम वर ही लक्ष द्यावे लागेल. 

        फ्लॅग पॅटर्न मधे  इंट्रा-डे साठी पंधरा मिनिट आणि एक तास ही टाईम फ्रेम योग्य असेल, तर स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडिंग साठी एक दिवसाची आणि आठवड्याची टाईम प्रेम योग्य काम करते.  हा पॅटर्न शेअर ट्रेडिंग बरोबरच कमोडिटी ट्रेडिंग, क्रिप्टो करेंसी ट्रेडिंग यासाठीही उपयुक्त आहे. हा समजायला आणि वापरायला सोपा चार्ट पॅटर्न आहे.

 पेनंट चार्ट पॅटर्न । PENNANT CHART PATTERN 

               टेक्निकल ऍनालिसिस मध्ये वापरल्या जाणाऱ्या चार्ट पॅटर्न मधील पेनंट या शब्दाचा अर्थ पताका असा आहे. यावरून पताका आणि ध्वज यामधील फरक लक्षात घेतला तर दोन्ही चार पॅटर्न मधला फरक लक्षात येईल. पेनंट चार्ट पॅटर्न हा फ्लॅग चार्ट पॅटर्न प्रमाणेच असतो यामध्ये आणि फ्लॅग पॅटर्नमध्ये एक महत्त्वाचा फरक म्हणजे फ्लॅग पॅटर्नमध्ये ध्वजा सारखा आकार तयार होतो तर यामध्ये पताका सारखा आकार तयार होतो म्हणूनच याला पेनंट चार्ट पॅटर्न असे म्हणतात हा कंटिन्यूएशन चार्ट पॅटर्न आहे. म्हणजे शेअर किंवा निर्देशांकामध्ये सुरु असलेली तेजी किंवा मंदी पुढे अजून काही काळ सुरू राहणार असल्याचे संकेत या पॅटर्न ने मिळतात.

  • पेनंट चार्ट पॅटर्न तांत्रिक विश्लेषणामध्ये वापरल्या जाणार्‍या ब्रेकआउटनंतर एकत्रीकरणाचा कालावधी चालू ठेवला जातो.
  • पेनांटमधील व्हॉल्यूम पाहणे महत्वाचे आहे – कन्सोलिडेसनचा कालावधी कमी प्रमाणात असावा आणि ब्रेकआउट्स जास्त व्हॉल्यूमवर असावेत.
  •  तांत्रिक विश्लेषणाच्या इतर प्रकारांच्या संयोगाने पेनंट चार्ट पॅटर्न वापरतात जे पुष्टीकरण म्हणून कार्य करतात.

 तेजी आणि मंदी च्या संकेतावरून या चार्ट पॅटर्नचे दोन प्रकार पडतात

  1. बुलिश पेनंट कंटिन्यूएशन चार्ट पॅटर्न
  2. बेरीश कंटिन्यूएशन पेनंट चार्ट पॅटर्न

बुलिश  कंटिन्यूएशन पेनंट चार्ट पॅटर्न | BULLISH CONTINUATION PENNANT CHART PATTERN 

                  टेक्निकल ऍनालिसिस मधील हा चार्ट पॅटर्न एखादा शेअर किंवा निर्देशांका मधील तेजी पुढे चालू राहणार असल्याचे संकेत देतो. तेजीच्या बाजारांमध्ये या प्रकारचा चार्ट पॅटर्न बनतो.

बुलिश  कंटिन्यूएशन पेनंट चार्ट पॅटर्न कसा बनतो ?

                  जेव्हा एखादा शेअर मध्ये किंवा निर्देशांकामध्ये मोठी हालचाल दिसून येते आणि ती चाल वरच्या दिशेने वाढणाऱ्या व्हॉल्युम सहित असेल,तर तो फ्लॅग पोल म्हणजेच ध्वजाचा दांडा  बनतो आणि त्यानंतर रेजिस्टन्स ला तो शेअर किंवा निर्देशांकाच्या किमती या कन्सोलिडेशन मध्ये जातात आणि काही काळ घटत्या वोल्युम सह एका छोट्या रेंजमध्ये कामकाज करतात त्या काळामध्ये छोटे-छोटे सपोर्ट आणि रेजिस्टन्स बनवले जातात. याच बरोबर या रेंज मधे व्हॉल्युम ही कमी होत असतो. जेव्हा दोन रेजिस्टन्स ला ऐका ट्रेंड लाईन ने जोडले जाते तेव्हा ती रेजिस्टन्स ट्रेंड लाईन बनते, तसेच सपोर्टला सपोर्ट ट्रेंड लाईन ने जोडले जाते. या मध्ये लक्षात घेण्याची बाब म्हणजे या दोन्ही ट्रेंड लाईन एका ठिकाणी एकत्र येऊन एकमेकांना छेदतात या सर्वांचा मिळून बनणारा आकार हा एका पताका सारखा दिसत असतो जेव्हा कॅन्डल स्टिक या त्रिकोणातून वरच्या बाजूला क्रॉस करून बंद होते आणि वल्ली मध्येही वाढ दिसून येते. तेव्हा तेजी पुन्हा सुरू झाल्याचे संकेत मिळतात.

बुलिश  कंटिन्यूएशन पेनंट चार्ट पॅटर्न नुसार खरेदी कशी करावी ?

              जेव्हा शेअर किंवा निर्देशांकाच्या किमतीची कॅन्डल स्टिक पताका च्या वरच्या बाजूला हे देऊन वरती बंद होते त्यानंतरच्या कॅण्डल स्टिक मध्ये खरेदी करावी आणि स्टॉप लॉस ज्या कॅन्डल स्टिक ने रेजिस्टन्स लाईनला छेद दिलेला आहे तिच्या निम्नस्तराचा ( LOW) खाली लावा. परंतु खरेदी करताना एका गोष्टीचे पालन करावे आणि ते म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशो तपासून पहावा जर तो योग्य असेल तरच खरेदी करावी.

पेनंट चार्ट पॅटर्न  नुसार टार्गेट कसे ठरवावे ?

               फ्लॅग पोलच्या बनण्यासाठी ज्या कॅन्डल स्टिक पासून तेजीला सुरुवात झालेली आहे आणि ज्या कॅन्डल स्टिक ने पहिला रेजिस्टन्स घेऊन किंमत कन्सोलिडेशन मध्ये गेलेले आहे. यामधील अंतर म्हणजेच फ्लॅग पोल ( ध्वजाच्या दांड्याची) एकूण उंची जेवढी आहे.  तेवढेच टारगेट खरेदी किमती पासून वरती ठेवावे. उदाहरणार्थ जर फ्लॅग पोलची उंची ही 10 पॉईंट असेल तर पताका मधील रेजिस्टन्स ला ब्रेक केल्यानंतर 10  पॉइंटचे टारगेट असेल. ( वरती दिलेल्या इमेज मधील A आणि B बिंदू पहा टार्गेट कसे काढायचे समजून येईल. )


                      पेनंट चार्ट पॅटर्न बनण्यासाठी किती कॅण्डल स्टिक असाव्यात असे काहीही बंधन नाही कधीकधी हा चार्ट पॅटर्न आठ ते दहा कॅण्डल स्टिक मध्ये ही बनवू शकतो तर कधी त्यापेक्षा जास्त ही कॅण्डल स्टिक चार्ट पॅटर्न बनण्यासाठी लागू शकता. चार्ट पॅटर्न बनण्यासाठी टाईम प्रेमचे जास्त महत्त्व नसते तो कोणत्याही टाईम फ्रेम वरती बनू शकतो आणि चांगले कामही करू शकतो

बेरिश  कंटिन्यूएशन पेनंट चार्ट पॅटर्न  :

           हा चार्ट पॅटर्न जर मंदीच्या चार्ट मध्ये दिसून आला तर चालू असलेले मंदी अजून काही काळासाठी पुढे चालू राहणार असल्याचे संकेत मिळतात. याचे कामही बेरीश फ्लॅग पॅटर्न प्रमाणेच असते.

बेरिश  कंटिन्यूएशन पेनंट चार्ट पॅटर्न कसा बनतो ?

           शेअर किंवा निर्देशांकामध्ये खालच्या दिशेने म्हणजेच मंदीच्या दिशेने मोठी हालचाल घडून येत असेल आणि व्हॉल्युम मध्येही वाढ होत असेल, तर ती हालचाल तयार होणाऱ्या पताका साठी ट्रेंड लाईन म्हणजेच पताका चा दांडा बनतो. मोठ्या हालचाली नंतर कॅण्डल स्टिक एका ठिकाणी सपोर्ट घेऊन कन्सोलिडेशन फेज मध्ये जातात. आणि एक छोट्या रेंजमध्ये कामकाज करायला सुरुवात करतात. या छोट्या रेंजमध्ये छोटे-छोटे सपोर्ट आणि रेजिस्टन्स बनायला सुरुवात होते. सपोर्टला जोडणारी सपोर्ट ट्रेंड लाईन काढली जाते, त्याचबरोबर रेजिस्टन्स ला जोडणारी रेजिस्टन्स ट्रेंड लाईन काढले जाते. या दोन्हीही ट्रेंड लाईन एका ठिकाणी भेटून एकमेकांना छेदतात हा सर्व आकार जर चार्ट वर काढला तर तो एखाद्या पताके प्रमाणे दिसतो जेव्हा कॅण्डल स्टिक सपोर्ट ट्रेंड लाईन ला तोडून खाली जाते ट्रेंड लाईन ब्रेक करणाऱ्या कॅण्डल स्टिक मध्ये व्हॉल्युम वाढताना दिसून येतो तेव्हा त्या शेअरमध्ये किंवा निर्देशांकामध्ये पुन्हा मंदीला सुरुवात झाली असे संकेत मिळतात.


पेनंट चार्ट पॅटर्न नुसार विक्री कशी करावी ?

                    जेव्हा एखादी कॅण्डल स्टिक पताका बनलेल्या सपोर्ट लाईनला तोडून त्याखाली बंद होते, त्यानंतरच्या कॅण्डल स्टिक मध्ये विक्री करावी आणि स्टॉप लॉस हा जे कॅण्डल स्टिकने सपोर्ट ट्रेंड लाईन ला ब्रेक केले आहे त्या कॅण्डल स्टीकचा सर्वोच्च स्तर (HIGH ) याच्या वरती लावा. या पॅटर्ननुसार विक्री करताना रिस्क रिवॉर्ड रेशो वरती लक्ष देणे गरजेचे आहे जर तो योग्य प्रमाणात असेल तरच विक्री करावी.

पेनंट चार्ट पॅटर्न नुसार टारगेट कसे ठरवावे ?

            अगोदरच सांगितल्याप्रमाणे पेनंट चार्ट पॅटर्न बनण्यासाठी सुरुवातीला जो फ्लॅग पोल म्हणजे ध्वजाचा दांडा बनलेला आहे त्याची उंची मोजून घ्यावी आणि पताका मधील सपोर्ट ट्रेंड लाईन ला ब्रेक केल्यानंतर त्या फ्लॅग पोलच्या उंची एवढे टार्गेट ठेवावे. म्हणजेच जर फ्लॅग पोलची ऊंची 10 पॉईंट असेल तर पॅटर्नमधील सपोर्ट लाईनच्या खाली टारगेट दहा पॉईंट असेल.

            वरील दोन्ही चार्ट पॅटर्न समजायला आणि चार्ट वर शोधायला सोपे चार्ट पॅटर्न आहेत.परंतु हे काम चांगल्या प्रकारे करतात चार्ट पॅटर्न बरोबरच वोल्युम वरती लक्ष देणे गरजेचे असते तसेच रिस्क रिवॉर्ड रेशो हा पाळला गेला पाहिजे. या दोन्ही चार्ट पॅटर्नमध्ये टाईम प्रेमचे जास्त विशेष असे महत्त्व नसते ते कोणत्याही टाईम प्रेम वरती बनू शकतात. आणि योग्य पद्धतीने कामही करू शकतात. परंतु इंट्राडे ट्रेडिंग साठी पंधरा मिनिट आणि एक तासाची टाईम प्रेम योग्य आहे. तर स्विंग ट्रेड  आणि पोझिशनल ट्रेडींगसाठी एक दिवसाची आणि एक आठवड्याचे कॅन्डल स्टिक टाईम फ्रेम चा उपयोग जास्त अचूकता देऊ शकतो.  साधे आणि सोपे असल्यामुळे बरेचदा या चार्ट पॅटर्न कडे दुर्लक्ष केले जाते परंतु याचा योग्य वापर केला तर बाजारामधील चाल समजून घेण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो.

आपुलकीचा सल्ला : शेअर मार्केट मधे जर गुंतवणूक करून किंवा ट्रेडिंग करून जर नफा कमवायचा असेल तर सुरवातीचा वेळ हा मार्केट समजून घेण्यासाठी द्यायलाच हवा. बहुतेक जण अगोदर तोटा सहन करतात आणि  नंतर मार्केट समजून घेण्याचा प्रयत्न करतात. रोजचा मार्केटविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही MAJHEMARKET हा टेलिग्राम जॉईन करू शकता. 

5 thoughts on “FLAG & PENNANT CHART PATTERNS IN MARATHI | फ्लॅग आणि पेनंट चार्ट पॅटर्न मराठी मधे”

Leave a Comment